जागतिक टीबी दिन- शस्त्रक्रियेने ‘टीबी’ बरा होऊ शकतो

भारतात सर्वात जास्त औषधांना दाद न देणाऱ्या टीबीचे रुग्ण आहेत. टीबीवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया हे देखील एक माध्यम आहे. ४-६ महिन्यांनी जर टीबीचा विषाणू शरीरात असेल, तर खराब झालेला भाग काढून टीबी बरा होऊ शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे आता अधिक सोप्प झालंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

टीबी भारतासमोर एक मोठं आव्हान आहे. भारतातील ४० टक्के लोकांना टीबी आहे. यातील काही लोकांच्या शरीरात टीबीचे विषाणू सूप्त स्वरूपात आहेत. भारतात दरवर्षी जवळपास ४ लाख ८० हजार लोकांचा टीबीमुळे मृत्यू होतो. एकाही औषधाला दाद न देणारा टीबी फक्त भारतातच आढळून येतो.

टीबीवर सद्य स्थितीला विविध प्रकारची औषध उपलब्ध आहेत. पण, टीबीचा विषाणू दिवसेंदिवस या औषधांना दाद न देणारा बनतोय. ही औषधं रुग्णांच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचत नाहीत, ज्याठिकाणी टीबीचा विषाणू पसरत असतो. टीबीच्या शस्त्रक्रियेमध्ये फुफ्फुसाचा टीबीमुळे खराब झालेला भाग काढून टाकण्यात येतो. जेणेकरून टीबी पसरण्यापासून थांबवणं शक्य होतं. त्यानंतर औषधांच्या सहाय्याने टीबीचे विषाणू मारता येऊ शकतात.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, टीबीचे उपचार सुरू होऊन ४-६ महिन्यांनी जर टीबीचा विषाणू शरीरात असेल तर शस्त्रक्रिया करू शकतो. थुंकीतून सतत रक्त जात असेल, फुफ्फुसात पोकळी निर्माण झाली असेल किंवा फंगल इन्फेक्शन झालं असेल. तर, शस्त्रक्रियेच्या माध्यमातून टीबी बरा करता येऊ शकतो. यामध्ये अजून एक समस्या म्हणजे फुफ्फुस आणि बरगडयांच्यामध्ये पू निर्माण झाला असेल तर त्यावर योग्य वेळीच शस्त्रक्रिया करणं आवश्यक असतं.

काही वर्षांपूर्वी करण्यात येणाऱ्या टीबीच्या शस्त्रक्रिया करताना ८-९ इंच छेद द्यावा लागायचा. पण, आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्हिडीओ असिस्टेड थोरॅस्कोस्कॉपीक शस्त्रक्रिया (व्हॅट्स) करता येते. यात शरीरावर मोठा छेद न देता अगदी छोटे छेद देऊन ही शस्त्रक्रिया होते.

व्हॅट्स शस्त्रक्रियेचे खूप फायदे आहेत. रुग्णाला या शस्त्रक्रियेत जास्त दुखत नाही. २-३ दिवसात रुग्ण घरी जाऊ शकतो आणि २-३ आठवड्यात काम सुरू करू शकतो. सामान्य शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पूर्ववत होण्यासाठी २-३ महिन्यांचा अवधी लागतो. त्यामुळे ही उपचारपद्धती खूप फायदेशीर आहे. ज्या शस्त्रक्रिया पूर्वापार ओपन पद्धतीने केल्या जात असत, जवळपास त्या सर्व आता व्हॅट्सने केल्या जाऊ शकतात.

(डॉ. अमोल भानुशाली, प्रसिद्ध व्हॅट्स सर्जन आहेत)

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)