स्त्रियांप्रमाणे पुरुषांनीही त्यांच्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. दाढी काढताना शेव्हिंग क्रिम आणि रेझरचा वापर होतो. यांचा सातत्यानं वापर केल्यानं चेहऱ्याच्या त्वचेला हानी पोहोचते. पुरुषांच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात होते. तसंच, चेहऱ्यावर मुरूमांचे प्रमाण वाढते. अनेकदा शेव्हींगदरम्यान चेहऱ्यावर जखमा होतात. त्याचे व्रणही उमटतात. यामुळे पुरुषांच्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. पुरूषांनी या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी या गोष्टींचा वापर करावा. यामुळे चेहरा साफ आणि चमकदार दिसेल.
काकडी
शेव्हींग दरम्यान चेहऱ्यावरील ओलावा कमी होतो आणि चेहरा कोरडा पडतो. अशावेळी काकडीचा फेसपॅक चेहऱ्याला लावावा. काकडीचा फेसपॅक पुरुषांच्या त्वचेवरील कोरडेपणा दूर करतो. काकडी चेहऱ्यातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते.
१ चमचा किसलेल्या काकडीमध्ये ओटमील आणि दही मिसळावे. हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. अर्ध्या तासाने हा पॅक साध्या पाण्याने धुवून घ्यावा.
केळाचा मास्क
केळामध्ये अनेक प्रकारची पोषण तत्व असतात. याच पोषक तत्वांमुळे केळ्याचा मास्क त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. शेव्हींग केल्यानंतर त्वचेला ओलावा देण्यासाठी हा मास्क वापरावा.
केळाचा मास्क वापरण्यासाठी केळे कुस्करून घ्या. त्यामध्ये दही आणि मध घाला. हे मिश्रण एकत्रित करून चेहऱ्यावर लावा. पंधरा मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या.
मधाचा मास्क
मधामध्ये नैसर्गिकरित्या मॉईश्चराईझर असतं. त्यामुळे फक्त मधाचा मास्क हा एक उत्तम फेसपॅक ठरेल. शेव्हिंग केल्यानंतर मधाचा मास्क लावणे फायदेशील ठरेल.