महिलांच्या आरोग्यासाठी ‘ड’ जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचं आहे. आहारात ‘ड’ जीवनसत्वाचं नियमितपणे सेवन केल्यास महिलांना रजोनिवृत्ती लवकर येण्याचा धोका कमी होतो. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रीशियनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलंय.
प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या वेगवेगळ्या तपासण्यांमध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली, की ‘ड’ जीवनसत्वाच्या सेवनामुळे शरीरात हॉर्मोन्स (संप्रेरक) वाढण्यास मदत होते. अंडाशय जास्त काळासाठी क्रियाशील रहाते, आणि अंडाशयातील अंडी संपण्याची प्रक्रिया धीम्या गतीने होते. हा अभ्यास यासाठी महत्त्वाचा आहे कारण अंडाशयातील अंडी संपल्यानंतर महिलेला रजोनिवृत्ती येते.
भारतातल्या महिलांसानी तर आहारातल्या ‘ड’ जीवनसत्वाचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. कारण एका अभ्यासानुसार भारतात ६५ ते ७० टक्के लोकांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता आढळून आली आहे.
‘ड’ जीवनसत्वानं कॅल्शियम पचायला मदत होते. याचसोबत, चेतासंस्थेचं काम सुरळीत चालण्यासाठीही ‘ड’ जीवनसत्वाची गरज आहे. शरीरातील ‘ड’ जीवनसत्वाचं प्रमाण वाढवण्यासाठी आहारात दुधाचं प्रमाण जास्त ठेवावं. याचसोबत लोण्यातूनही ‘ड’ जीवनसत्व मिळतं. कोवळा सुर्यप्रकाशही ‘ड’ जीवनसत्वाचा चांगला स्रोत आहे.