घेण्यास सोपी आणि कुठलीही साईड इफेक्ट्स न होणारी अशी होमिओपॅथीची औषधं असतात. पण ही औषधं घेताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. औषधांचा चांगला प्रभाव होण्यासाठी काही पथ्य पाळणं गरजेचं आहे, असं तज्ज सांगतात. यामुळे औषधांचा प्रभाव टिकून राहण्यासही मदत होईल.
औषधं उघडी ठेऊ नका
होमिओपॅथीची औषधं उघडी ठेऊ नका. कोरड्या आणि थंड जागेतच औषधं ठेवा. औषध घेतल्यानंतर बाटलीचं झाकण, आठवणीनं तातडीनं बंद करा.
औषधांना स्पर्श करु नका
औषध घेताना त्यांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. बाटलीच्या झाकणातून सरळ तोंडात औषध घ्या. द्रव स्वरुपातलं औषध असल्यास ड्रॉपरचा वापर करा. त्वचेच्या संपर्कामुळे होमिओपॅथी औषधांचा प्रभाव कमी होतो.
अर्ध्या तासाचा नियम पाळा
होमिओपॅथी औषधं घेण्याच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर काहीही खाणं किंवा पिणं टाळा. याला अपवाद फक्त साध्या पाण्याचा आहे. साध्या पाण्याशिवाय कुठल्याही पदार्थाचं सेवन करता कामा नये.
व्यसनांना दूर ठेवा
ही सगळ्यात महत्त्वाची पथ्य आहे. होमिओपॅथीच्या प्रभावी परिणामांसाठी धुम्रपान, दारु, तंबाखू यांसारखी व्यसनं दुर ठेवणं गरजेचं आहे. शिवाय कुठल्याही मादक पदार्थांचं सेवन करता कामा नये.
आहारातली पथ्यं
होमिओपॅथी उपचार घेताना आहारात तिव्र गंध असलेले पदार्थ टाळणं श्रेयस्कर असल्याचं सांगितलं जायचं. लसुण, आलं, कच्चे कांदे, कॅफी यांसारख्या पदार्थांना तीव्र गंध असतो. यामुळे होमिओपॅथी औषधांचा परिणाम कमी होतो. काही नवीन संशोधनानुसार अर्ध्या तासाचा नियम पाळल्यास या पदार्थांचा दुष्परिणाम होणार नाही. यासंदर्भात आपल्या डॉक्टरकडून एकदा खात्री करुन घ्या.
उपचार पद्धतींचं मिश्रण नको
होमिओपॅथी औषधं घेत असताना अॅलोपॅथी किंवा आयुर्वेदीक उपचार पद्धतींचा वापर टाळा. कुठलीही औषधं घेण्याआधी किंवा सोडण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.