राज्यभरात स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढताना दिसून येतोय. दिवसेंदिवस स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत राज्यभरात ४१८ रुग्णांचा मृत्यूंची नोंद झालीये. मात्र आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्या सांगण्यानुसार, “हे सर्व मृत्यू केवळ स्वाईन फ्लूमुळे झाले असे म्हणता येणार नाही. या मृत्यूंपैकी जवळपास ६० टक्के रुग्ण हे अतिजोखमीच्या म्हणजेच हृदयविकार, अतिउच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग अशा आजाराने देखील ग्रस्त होते.”
स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ४० मृत्यू हे नाशिक मनपा क्षेत्रात झाले आहेत. त्याखालोखाल पुणे मनपा आणि पुणे ग्रामीणमध्ये अनुक्रमे ३६ आणि ३१ रुग्ण दगावलेत. मराठवाडा आणि विदर्भात स्वाईन फ्लूचे प्रमाण कमी आहे. या भागातील बीड, धुळे, वाशीम, जळगाव, जालना या जिल्ह्यात प्रत्येकी २ तर हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, भंडारा या जिल्ह्यात प्रत्येकी १ रुग्ण स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावल्याची नोंद करण्यात आलीये.
राज्यभरात स्वाईन फ्लू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत असून सर्व रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी उपचार सुविधा असणाऱ्या खासगी रुग्णालयांना देखील स्वाईन फ्लूच्या उपचाराची मान्यता देण्यात आलीये.
आरोग्यमंत्री पुढे म्हणतात की, “स्वाईन फ्लू प्रतिबंधक व उपचारासाठी राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेकडून यापूर्वीच आवश्यक ती पाऊलं उचलण्यात आली आहेत. राज्यात २,१९९ ठिकाणी स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या तपासणीसाठी केंद्र सुरू करण्यात आली असून आतापर्यंत १३ लाख ६२ हजार रुग्णांची तपासणीही करण्यात आलीये.”
“स्वाईन फ्लू वरील ऑसेलटॅमिवीर औषध आणि इतर साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत लसीकरण सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांबरोबरच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना देखील ही लस देण्यात येत आहे. अतिजोखमीच्या गटातील रुग्णांनी तसेच ज्येष्ठ नागरीक, लहान मुले, गरोदर स्त्रिया यांना लसीकरण करून घ्यावे,” असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलंय.