महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या हस्ते खोडाळा येथील ‘पेपरलेस प्राथमिक आरोग्य केंद्र’ या योजनेचं बुधवारी उद्घाटन करण्यात आलंय. त्यासोबतच आरोग्यमंत्र्यांनी पालघर कुपोषण निर्मुलन टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून पालघर आणि तेथील इतर परिसरातील आरोग्य केंद्रांना भेट दिलीये. या भेटी मार्फत त्यांनी कुपोषणाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय.
आरोग्य विभागामार्फत “चला पालघर जिल्हा कुपोषण मुक्त करूया” या अभियानाची सुरुवात करण्यात आलीये. या दौऱ्यांतर्गतच आरोग्यमंत्र्यांनी मोखाड्यातील खोडाळा आणि वाशाळा या प्राथमिक आरोग्य केंद्राची देखील भेट घेतलीये. या दरम्यान त्यांनी खोडाळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल असलेल्या ११ कुपोषित बालकांच्या सुधारणेबाबत माहिती घेतली. शिवाय एकूणच मोखाडा तालुक्यातील कुपोषणाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
मोखाड्यातील गोमघर येथे आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन वर्षात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आरोग्यसेवा उपलब्ध करण्यात आली नव्हती. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी या उपकेंद्रासाठी तातडीने कर्मचा-यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष गायकवाड यांना दिले आहेत.