रेल्वे स्टेशनवर अवयवदानाची जनजागृती करणारा ‘आरोग्यदूत’

कांदिवली स्टेशनवर रमेश डोंगरे हे नाव सर्वांना परिचयाचं आहे. स्टेशनवर उभं राहून अवयवदानाचं महत्त्व, तंबाखूमुळे होणारे आजार याबाबत जनजागृती करणारा आरोग्यदूत म्हणून ते प्रसिद्ध आहेत. गेल्या आठ वर्षांपासून रमेश डोंगरे दररोज न चुकता स्टेशनवर येऊन आरोग्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करतात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

रिटायरमेंटचं लाईफ म्हणजे थोडा आराम…बाहेर फिरायला जाणं..मनात आलं की थेट गाव गाठायचं..वयाच्या साठीनंतर बस्स झालं काम असं म्हणणारे अनेक आहेत. पण, आता आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत एका ६८ वर्षीय आरोग्यदूताची.

रमेश डोंगरे

मी समाजाला काहीतरी देणं लागतो, असा विचार मनात आला आणि या आरोग्यदूताने काम सुरू केलं. गेली आठ वर्ष सातत्याने दिवसातून एक तास हा आरोग्यदूत लोकांना तंबाखूमुळे होणारे आजार, अवयवदान या विषयांवर माहिती देतोय. हा आरोग्यदूत म्हणजे कांदिवलीचे रमेश डोंगरे.

टाटा इंन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी समाजकार्याचा वसा हाती घेतला. अवयवदान, ध्वनिप्रदूषण, तंबाखू सेवन, स्वच्छता या विषयांवर डोंगरे कांदिवली स्टेशनवर जनजागृती करतात. जनजागृती हे त्यांच्या दैनंदिन आयुष्यातलं एक कामचं आहे. विविध आरोग्यविषयक माहितीचे बॅनर गळ्यात घालून डोंगरे रेल्वे स्थानकांवर फिरतात.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना रमेश डोंगरे म्हणतात, “२०११ साली निवृत्त झाल्यानंतर मी जनजागृतीचं काम सुरु केलं. अस्वच्छता, तंबाखू सेवन आणि अवयवदानाबाबत लोकांमध्ये अजूनही जनजागृती नाही. अवयवदानाबाबत समाजात फार गैरसमज आहेत. म्हणूनच, अवयवदानाची माहिती असलेले बॅनर मी तयार केले. याच्या माध्यमातून मी लोकांना माहिती पुरवतो.”

डोंगरे स्टेशनवर कोणतीही घोषणा देत नाहीत. त्यांचे बॅनर वाचून ज्या व्यक्ती अधिक माहितीसाठी येतात त्यांना डोंगरे त्या-त्या विषयाबाबत जागरूक करतात.

डोंगरे पुढे म्हणाले की, “अवयवदानाच्या जनजागृतीसंदर्भात लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. मी माझ्यासोबत अवयवदानाचे फॉर्म घेऊन फिरतो. फेब्रुवारी महिन्यात जवळपास २० जणांनी माझ्याकडून हे फॉर्म घेतलेत. अवयवदानाचं महत्त्व लोकांमध्ये वाढताना दिसून येतंय. इतकंच नाही तर तंबाखूच्या जनजागृतीमुळे मला ८१ वर्षीय व्यक्तीने सिगारेट सोडल्याचंही सांगितलं.”

अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरे यांचे प्रयत्न सुरु आहेत. या जनजागृतीसाठी डोंगरे यांनी विरार ते चर्चगेट असा पासच काढून ठेवलाय. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर उभं रहायचं आणि लोकांना आरोग्यविषयक माहिती द्यायची हा रमेश डोंगरेंचा दिनक्रम आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)