वेळ सकाळी दहा वाजताची..गुरूवारी नेहमीप्रमाणेच बुंगळुरू एअरपोर्टवर प्रवाशांची गर्दी होती..’जेट एअरवेज’चं विमान 9W0973 BLR DEL मुंबईच्या दिशेने उड्डाण करण्यासाठी सज्ज होतं. सर्व प्रवासी विमानात बसले आणि विमानाने मुंबईच्या दिशेने आकाशात झेप घेतली. सगळं काही अगदी नेहमीसारखंच..प्रवासी आपापल्या कामात मग्न होते. आणि अचानक…
एका प्रवाशाला श्वास घेण्यास खूप त्रास होऊ लागला. चक्कर येऊ लागली. डोळ्यासमोर काहीच दिसत नव्हतं..घाम येऊ लागला होता. वेळ नाजूक होती. वैद्यकीय सहाय्यता मिळणं तात्काळ गरजेचं होतं. विमान जमीनीपासून हजारो फुट उंचावर..अशा परिस्थिती काय करायचं? असा प्रश्न प्रवाशांच्या मनात घर करून गेला. पण, या नाजूक परिस्थितीत प्रवाशाच्या मदतीसाठी घाऊन आला जेट एअरवेजचा फ्लाइट अटेंडंट ‘अमनदीप’
याच विमानातून जनतादल युनायडेट पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तनवीर अहमद प्रवास करत होते. ज्या प्रवाशाची तब्येत खराब झाली होती, त्यांच्यापासून काही सीट मागेच तनवीर अहमद बसले होते.
माय मेडिकल मंत्राशी बोलताना तनवीर अहमद म्हणाले, “या प्रवाशाला तात्काळ वैद्यकीय मदत गरजेची होती. खूप त्रास झाल्यानंतर हा प्रवासी अचानक कोसळला. पण, अमनदीपने खूप मदत केली. अमनदीपने या प्रवाशाला तात्काळ कार्डियोपल्मनरी रेसुसिटेशन म्हणजेच ‘सीपीआर’ दिला. ४५ मिनीटं ते जवळपास १ तास अमनदीप या प्रवाशासोबत होता. प्रवाशाच्या तोंडात ऑक्सिजन देण्यासाठी मदत केली. छातीवर दाब देऊन हृदयाचं कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.”
तनवीर अहमद पुढे म्हणतात, “माझ्यसाठी अमनदीप हीरो आहे. त्याने त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. तात्काळ प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळाल्याने तासाभराने तो प्रवासी पुन्हा शुद्धीवर आला आणि श्वास घेऊ लागला. अमनदीप सुपरस्टार आहे. त्यांने अतिशय नाजूक परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली. डोकं शांत ठेवून त्याने त्याला माहिती असलेल्या आपात्कालीन परिस्थितीतील भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली.”
- जिनेव्हामध्ये झालेल्या वैद्यकीय बैठकीतील आकडेवारीनुसार वर्षाला १००० लोकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं विमानप्रवासादरम्यान मृत्यू होतो.
- यामुळे विमानात हृदयविकारावर प्रथमोपचार करण्यासाठीचं साहित्य असावं अशी मागणी डॉक्टरांनी केलीये.
या प्रकरणांमध्ये जेट एअरवेजच्या म्हणण्यानुसार, जेट एअरवेज’चं विमान 9W0973 मध्ये गुरुवारी एका व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज भासली. अमनदीप या आमच्या अलर्ट क्रू मेंमरकडून या व्यक्तीवर तातडीने प्रथमोपचार कऱण्यात आले. विमानात असणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांकडून रूग्णाला याआधी असणाऱ्या वैद्यकीय समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर विमानाच्या नियमांनुसार त्या व्यक्तीला ऑक्सिजन आणि वैद्यकीय मदत पुरवण्यात आली.