जाणून घ्या, रोजच्या वापरातील औषधी वनस्पती

आपल्या रोजच्या वापरात अशाच काही वनस्पती आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत, मात्र त्यांचे औषधी गुणधर्म आपण जाणत नाही. अशा वनस्पतींची आपण आज माहिती करून घेऊ...

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

भारतात प्राचीन काळापासून औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. पूर्वी वैद्य या वनस्पतींच्या आधारेच औषधोपचार करत असत. या वनस्पतींमध्ये काही दुर्मिळ वनस्पती, तर काही सहज उपलब्ध होणाऱ्या वनस्पती आहेत. आपल्या रोजच्या वापरातही अशाच काही औषधी वनस्पती आहेत.

आपल्या आजूबाजूला असलेल्या वनस्पती आपण रोज पाहतो, वापरतो; पण यांच्या गुणांची आपल्याला माहिती नसते. या वनस्पती खरेतर औषधी आहेत. उदा. ताप आल्यास बेल, शरीरातील उष्णतेवर दुर्वा, खोकला झाला तर तुळशीचा काढा असे उपचार केले जातात.

तुळस

तुळस घरोघरी असतेच. आता मात्र अंगण नसल्याने प्रमाण कमी झालेय इतकेच. पण आजही लोक खिडकीत का होईना तुळस लावतातच.

एक तुळस अनेक आजारांना पळवून लावते. सर्दी, खोकला, तापावर तुळस गुणकारी आहे. उचकी लागल्यास तुळशीच्या पानांचा रस आणि मध एकत्रित खावा. त्वचेच्या आजारावर पानांचा रस किंवा पाने चोळावीत, आराम मिळतो.

गवती चहा

गवती चहाच्या पातीमुळे चहाचा स्वाद तर वाढतोच शिवाय शरीरात तरतरी येते. ताप आला असता गवती चहाचा काढा देतात. यामुळे घाम सुटून ताप लवकर जातो. दिवसभरात खूपच दमलेले असाल तर चहाची पात आणि तुळस यांचे पेय आपला थकवा दूर करेल.

ब्राह्मी

ब्राह्मीला मंडूकपर्णी देखील म्हणतात. स्मरणशक्ती वाढीसाठी ब्राह्मी सर्वोत्तम. केसांच्या वाढीसाठी ब्राह्मीची पूड लावली जाते. चेहऱ्यावर फोड आले असतील तर देशी गाईच्या तुपात मध आणि ब्राह्मीचा रस करून लावावा.

पुदिना

पुदिन्याची चटणी आपण नेहमीच खातो. पुदिना अपचन, अजीर्ण झाल्यास सर्वोत्तम. पुदिन्याच्या चटणीसाठी ताजी पाने वापरावीत.

कोरफड

कोरफडीचा गर औषध म्हणून वापरतात. त्वचेसाठी कोरफडीचा गर सर्वोत्तम. चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डागही जातात. हळदीत कोरफडीचा गर घालून तयार केलेला लेप लावल्यास जखम लवकर बरी होते. केसांच्या आरोग्यासाठीही कोरफडीचा गर चांगला. कोरफडचा गर पातळ करून केसांना लावावा. त्यामुळे केस मजबूत होतात, कोंढा जातो, केस गळणे थांबते, उवा कमी होतात.

रुई

आपल्या आजूबाजूला असलेली रुईची पानेही औषधी आहेत. ही झाडे कुठेही उगवलेली असतात. पायात काटा रुतलेल्या ठिकाणी फोड आल्यास त्याला रुईच्या झाडाचा डिंक लावावा, फोड लवकर बरा होतो. लहान मुलांचे पोट दुखत असल्यास पान गरम करून शेकावे.

दुर्वा

शरीरात उष्णता निर्माण झाल्यास दुर्वा अत्यंत गुणकारी आहेत. अंगावर उष्णतेच्या पुळ्या येणे, नाकातून रक्त येणे अशावेळी दुर्वांच्या रसाचे २ थेंब नाकात टाकावे. आराम मिळतो.

झेंडू

झेंडूच्या पानांचा रस जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते. प्रथमोपचारासाठी आपल्याकडे काहीही नसेल तर याचा वापर आवर्जुन करावा.

नागवेल

या पानांचा फायदा अन्नपचनासाठी होतो. जेवणानंतर गुलकंद, बडिशेप टाकून पान खावे. यामुळे लाळ मोठ्या प्रमाणात निघून अन्नपचनास मदत होते.

अडुळसा

खोकल्यावर अडुळसा सर्वोत्तम. अडुळशाच्या पानांच्या रसात मध घालून घ्यावा. अडुळशाची पाने तव्यावर गरम करून सूज आलेल्या ठिकाणी बांधल्यास सूज उतरते. कपड्यांना कसर लागत असेल तर अडुळशाची पाने ठेवावी. अडुळशाच्या पानांचा धूर घेतल्यास दम्याच्या आजारात आराम मिळतो.

गुलाब

गावठी गुलाब औषधी असतो. गावठी गुलाबाच्या पाकळ्या सुरवून मिठाईवर, खिरीवर घालून खातात. तसेच त्याचा गुलकंद बनवून खाऊ शकतो. यामुळे शौचास साफ होणे, डोळ्यांची जळजळ शरीरातील उष्णता कमी होते.

जास्वंद

जास्वंदाची पाने आणि फुले दोघांचाही वापर केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो. जास्वंदीचे तेलही वापरले जाते. जास्वंदाची फुले खडीसाखरेबरोबर खाल्ल्यास मेंदू अधिक तल्लक होतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter