दोन हात, एक पाय नसतानाही शेतकऱ्यांसाठी झटणारी यवतमाळची ‘चेतनादूत’

सध्याचं जीवन धकाधकीचं आहे. मुलांवर अभ्यासाचा ताण, तर आपल्या सर्वांवर कामाचा ताण आहे. सतत तणावाखाली आपण जगत असतो. कोणतं ना कोणतं प्रेशर आपल्या डोक्यावर सतत असतं. या तणावामुळे चिडचिडेपणा वाढतो, आणि कुठे आपण कमी पडलो तर प्रचंड मानसिक तणाव वाढतो. काही मुलं किंवा युवक हा तणाव सहन करू शकत नाहीत, आणि आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्विकारतात. पण, आता तुम्ही अशा मुलीला भेटणार आहात, जी फक्त २२ वर्षांची असूनही तीची जिद्द मात्र वाखाणण्याजोगी आहे.

0
313
सोर्स-मायमेडिकलमंत्रा
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

शिरीन तबस्सुम, विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यात रहाणारी ही मुलगी. शिरीन जन्मत:च अपंग आहे. तिला दोन्ही हात आणि एक पाय नाही. पण, शिरीनला दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वासाची एक दैवी देणगीच मिळालीये.

“मला तुमच्यासारखे हात नाहीत, आणि फक्त एक पाय आहे. जगासाठी मी अपंग आहे, पण मी अपंग नाही. माझ्यापेक्षा लोकांना माझ्या अपंगत्वाची जास्त चिंता वाटते. मी जन्मत:च अशी आहे, म्हणून काय मी आत्महत्या करू? मी हरले नाही, आणि हार मानणारही नाही. मला मोठं होऊन कलेक्टर व्हायचंय.”

शिरीन म्हणते, प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येतात, प्रक्येकाच्या जीवनात वाईट काळ हा येतोच, पण रात्रीच्या अंधारानंतर सुर्यप्रकाश होतोच ना?  त्यासारखेच सुखी दिवसही येतात. तुझ्या अपंगत्वामुळे तू, डीप्रेस किंवा मानसिक तणावाखाली आहेस का, या प्रश्नाला शिरीन ‘अजिबात नाही” असं उत्तर देते.

शिरीन पुढे सांगते, “मी मानसिक तणावाखाली का जगू? का, तर मला दोन्ही हात आणि एक पाय नाही म्हणून? हात, पाय नसले तरी मला कोणतीही गोष्ट करण्यापासून कोणी रोकू शकत नाही. मी सामान्य व्यक्तिप्रमाणे सर्वाकाही करू सहजतेने करू शकते. मला देवाने इतकं सुंदर आयुष्य दिलंय, मी समाधानी आहे”.

गेल्याकाही वर्षांपासून यवतमाळला शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी ओळख मिळालीये, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्यांचं एक प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांनी गमावलेला आत्मविश्वास आणि नैराश्य.

आपले भाऊ जीवन संपवतायत, आत्महत्या करतायत, हे पाहून शिरीनचं मन विषण्ण झालं, शिरीनने तिच्या आयुष्याची कहाणी शेतकऱ्यांना सांगायची ठरवली, आणि हळुहळु एक मोहिम सुरू केली.

“कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे शेतकरी जगण्यापेक्षा मृत्यूला कवटाळतोय. घरी पैसे नसल्याने नैराश्य आणि मानसिक तणाव वाढतोय, आणि बळीराजा आत्महत्या करतोय.”

शिरीनने शेतकऱ्याला अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ग्रामीण भागाचा दौरा सुरू केला. एका वर्षी पीक नाही तर दुसऱ्यावर्षी येईल, पण आत्महत्या करू नका असं आवाहन करत शिरीन जिल्हाभर फिरतेय.

शिरीन म्हणते, “मी त्यांना सांगते, माझ्याकडे पाहा. आत्महत्या करण्यापूर्वी माझी गोष्ट ऐका. तुमच्यासारखचं तुमच्या मुलांना आत्महत्या करून मरताना तुम्हाला पाहायचंय का?” शिरीनचा हा सवाल सर्व शेतकऱ्यांना आहे.

शिरीनच्या या इच्छाशक्तीला सलाम करत, यवतमाळ जिल्हा प्रशासनाने तिची ‘चेतना दूत’ म्हणून नेमणूकही केलीये.

“गेल्या दिड वर्षापासून शिरीन चेतना दूत, म्हणून काम करतेय. शिरीन, प्रचंड मेहनती, आणि स्मार्ट आहे. ती शेतकऱ्यांसोबत चर्चा करते, आणि ती कशी निर्धाराने जगतेय ते सर्वांना समजावून देते. शिरीन, नैराश्यात, आणि मानसिक तणावाखाली जगणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे” अशी भावना यवतमाळचे अतिरिक्त निवासी जिल्हाधिकारी राजेश खावलेंनी मायमेडिकलमंत्राशी बोलताना व्यक्त केली.

सोर्स-गूगल

शिरीनच्या आई शकीला बानो म्हणतात, “शिरीनसाठी आम्ही कधीच आशा सोडली नाही. शिरीनचे वडील तिचा उजवा, तर मी डावा हात आहे. ती सर्वकाही स्वत:च करते. भाजी चिरते, मोबाईल वापरते आणि मेहेंदी पण काढते. ती आमच्यासाठी अपंग नाही”

शिरीनच काम पाहून तिच्या वडिलांचा ऊर गर्वानं फूलतो. “शिरीन म्हणजे माझा पाठीचा कणाच, तिच्यात प्रचंड उर्जा आहे. ती शेतकऱ्यांसाठी दिवस-रात्र झटते. ती शेतकऱ्यांसाठी काम करताना पाहून मला गर्व होतो. आम्ही गरीब आहोत, पण शिरीनसाठी आम्ही सर्वकाही करायला तयार आहोत,” अशी भावना शिरीनचे वडील शेख शमशीर यांनी व्यक्त केली.

भारतात, आत्महत्येचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे नैराश्य किंवा डीप्रेशन. काम, अभ्यास, स्पर्धा अशा अनेक कारणांमुळे मुलं निराश होतात. शाळकरी मुलं आणि तरूण-युवा वर्ग नैराश्याला वेगाने बळी पडतोय. आणि म्हणूनच यंदा 7 एप्रिल, म्हणजेच जागतिक आरोग्य दिनी, डीप्रेशन हा चर्चेचा विषय म्हणून निवडण्यात आला होता.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter