आपल्यापैकी अनेक जणांना जेवताना ताटात बाजूला मीठ हे लागतंच. शिवाय काही व्यक्ती जेवणात वरून मीठ वाढून घेतात. मात्र मीठाचं जास्त सेवन हे आरोग्यासाठी धोकादायक असतं. मीठाचं सेवन लोकांनी कमी करावं म्हणून खास जनजगृतीचा कार्यक्रम राबवलाय. अमर गांधी फाऊंडेशऩ आणि मुंबई किडनी फाऊंडेशनतर्फे #EkChammachKam हा जनजगृतीचा कार्यक्रम राबवण्यात आलाय.
या उपक्रमात शहरातील जवळपास १५० नेफ्रोलॉजीस्ट सहभागी झाले होते. फक्त शहरातीलच नव्हे तर जगभरातील प्रख्यात डॉक्टरांनी देखील यामध्ये दाखल झाले. तर #EkChammachKam या उपक्रमाला श्री.श्री रविशंकर आणि चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी देखील या उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शवलाय.
यासंदर्भात बोलताना अमर गांधी फाऊंडेशनचे डॉ. भूपेंद्र गांधी म्हणाले की, “किडनीचे आजारांना सायलंट किलर म्हटलं जातं कारण या आजार शेवटच्या टप्प्यात पोहोचेपर्यंत याची लक्षणं दिसून येत नाहीत.”
वरिष्ठ नेफ्रोलॉजीस्ट डॉ. उमेश खन्ना यांच्या सांगण्यानुसार, “महिलांना शक्यतो चटपटीत खाद्यपदार्थ फार आवडतात. यामुळे त्यांच्या आहारात मीठाचं प्रमाण वाढतं. शिवाय महिलांनी कुटुंबीयांच्या आहारातील कमी मीठाच्या प्रमाणावर लक्ष देणं गरजेचं आहे. किडनीच्या आजारांसाठी वेळेवर तपासण्या करून घेण्याबाबत जनजागृती होणं आवश्यक आहे.”
श्री.श्री रविशंकर यांनी पाठिंबा दिल्यानंतर डॉ. भावेश वोरा म्हणाले की, “श्री.श्री रविशंकर या उपक्रमाबाबत जाणून घेण्यासाठी फार उत्सुक होते.”
चित्रपट निर्माते राकेश मेहरा यांच्या सांगण्यानुसार, “आहारात मीठाचं जास्त प्रमाण हे शरीरासाठी धोकादायक असतं. अति मीठामुळे हायपरटेन्शनचा धोका संभवतो. याशिवाय हृदयावर देखील दबाव निर्माण होतो.”
एशियन हार्ट इंस्टिट्युटचे डॉ. रमाकांत पांडा, सर एच एऩ रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे सीईओ जलाल दानी, वोकार्ट रूग्णालयाचे बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरीचे संचालक डॉ. रमण गोयल आणि ज्युपिटर रूग्णालयाचे कर्पोरेट सीईओ डॉ. रविंद्र करंजेकर या उपक्रमाला उपस्थित होते.












