“टीबीमुळे मी माझ्या मुलगा गमावून बसेन अशी भीती मला वाटत होती,” हे शब्द आहेत टीबीने गस्त असलेल्या एका मुलाच्या आईचे. संगीता गिरे यांचा १७ वर्षीय मुलगा विशाल २०१७ साली दहावीच्या परिक्षेची कसून तयारी करत होता. अभ्यास आणि बोर्डाची परीक्षा यांचा ताण असतानाच विशालसमोर एक मोठी समस्या येऊन उभी ठाकली. ती म्हणजे दहावीच्या वर्षालाच विशालला टीबीचं निदान झालं. तब्बल एक वर्ष टीबीशी झुंज दिल्यानंतर विशाल बरा होऊन अखेर घरी परतलाय. या एक वर्षात संगीता यांनी दिवस रात्र एक करत घरी न जाता आपल्या मुलाची सेवा केलीये.
गिरे कुटुंबीयांच्या घरची प्रकृती हलाखीची असल्यानं विशालच्या उपचारासाठी पैसे नव्हते. मात्र त्यावेळी संगीता यांनी कुठलाही विचार न करता जवळ असलेले पैसे घेऊन क्षय रुग्णालय गाठलं. फेब्रुवारी २०१७ मध्ये या रुग्णालयातील डॉक्टरांची वैद्यकीय चाचणी केली. यावेळी विशालला एमडीआर टीबी असल्याचं निदान झालं.
टीबी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर पवार यांनी आणि त्यांच्या डॉक्टरांच्या टीमनं विशालवर उपचार करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात बोलताना क्षय रुग्णालयातील डॉ. अमर पवार यांनी सांगितलं की, ‘‘विशालच्या फुफ्फुसात पू जमा झाल्यानं तो काढण्यासाठी डॉक्टरांनी व्हिडिओ असिस्टेड थोरॅकोस्कोपिक (VAT) शस्त्रक्रिया करायचं ठरवलं. त्यानुसार ऑक्टोबर २०१७ रोजी या मुलावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर आता मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आता या मुलाला डिस्चार्ज मिळालायं’’.
गेले वर्षभर विशालवर रुग्णालयात उपचार सुरू होते. यातच संगिता सुद्धा रुग्णालयातच थांबायच्या. चक्क वर्षभरानंतर आई आणि मुलगा त्यांच्या घरी परतलेत.
या रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. ललितकुमार आनंदे यांनी या शस्त्रक्रियेबाबत माहिती देताना सांगितलं की,
- एमडीआर टीबी जरं औषधांना दाद देत नसल्यास त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते
- फुफ्फुसाचा टीबी असल्यास रुग्णाच्या खोकल्यातून रक्त बाहेर येतं, फुफ्फुस संकुचित किंवा खराब होतं. त्यामुळे फुफ्फुसाचं कार्य योग्य पद्धतीनं होत नाही
- फुफ्फसात पू जमा होतो
- अशा स्थितीत शस्त्रक्रियेद्वारे हा पू काढून टाकावा लागतो
डॉ. आनंदे यांच्या सांगण्यानुसार, विशाल आला तेव्हा त्याची प्रकृती खूपच बिकट होती. त्याचं वजन फक्त ३९ किलो होतं. पण या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आता त्याचं वजन ५८ किलो झालंय. विशालला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न आहेतच शिवाय या मुलाच्या आईनं सुद्धा रुग्णालयात राहून खूप केलंय.”
विशालची आई संगीता गिरे म्हणाल्या, “क्षयरोगामुळे मुलाला गमावणार की काय अशी भिती मनात सतावू लागली होती. कारण उपचारासाठी माझ्याकडे पैसेच नव्हते. पण या रुग्णालयातील डॉक्टरांनी माझ्याकडून एक पैशाही न घेता मुलावर उपचार केलेत. त्यामुळे त्यांचे आभार.
“दहावीत टीबी झाल्याने परीक्षा देता आली नाही. परंतु, आता मी ठणठणीत बरा झालो असून बाहेरून फॉर्म भरून परीक्षा देण्याचा विचार करतोय,” असं विशालनं सांगितलं.