राज्य मंत्रिमंडळाने राज्यातल्या पहिल्या ‘मेडिकल हब’ला मंजूरी दिलीये. हे ‘मेडिकल हब’ जळगाव जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे, या ‘मेडिकल हब’मध्ये रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सोयी-सुविधा एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाने याला मान्यता देतानाच, या ‘मेडिकल हब’च्या उभारणीसाठी १२५० कोटी रूपयांचा निधीही मंजूर केला.
राज्य सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयाचा मोठा फायदा, उत्तर-महाराष्ट्रातील जनतेला होणार आहे. उत्तर-महाराष्ट्रातल्या लोकांना आता वैद्यकीय सुविधांसाठी मुंबई गाठावी लागणार नाही.
या ‘मेडिकल हब’मध्ये आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या ‘मेडिकल हब’मध्ये १०० विद्यार्थी संख्येचं मेडिकल कॉलेज, १०० विद्यार्थी संख्या असलेलं आयुर्वेद कॉलेज, अत्याधुनिक सुविधा असलेलं ५० विद्यार्थी संख्येचं दंत महाविद्यालय आणि होमियोपॅथी कॉलेजही असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील चिंचोली गावात, उभारण्यात येणाऱ्या या मेडिकल हबसाठी राज्य सरकारने १२५० कोटी रूपयांचा निधी मंजूर केलाय.
मेडिकल हब विषयी माय मेडिकल मंत्राशी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी सांगितलं की, “हे ‘मेडिकल हब’ राज्यातील पहिलं, सर्व सोयी-सुविधा एकाच छताखाली असणारे मेडिकल हब असेल. या ‘मेडिकल हब’मुळे आपल्याला वैद्यकीय शास्त्रातील अत्याधुनिक संशोधन करता येईल, त्याचसोबत आयुर्वेदसारख्या विषयावरही संशोधन करता येईल.”
गिरीष महाजन पुढे म्हणतात, “येणाऱ्या काही वर्षात, जळगाव एक ‘मेडिकल हब’ म्हणून राज्यात नावारूपास येईल. या माध्यमातून आपण गोरगरीब जनतेला, ग्रामीण भागात चांगल्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देवू शकतो.”