झिम्बाब्वेच्या रहिवाशी असणारे ४१ वर्षीय सुमानिया तोशिगंधा…गेले ९ वर्ष सुमानिया टीबी या गंभीर आजाराने ग्रस्त होते. यासाठी त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे उपचार सुरु केले. मात्र त्याचा काहीही फायदा न झाल्याने त्यांनी थेट मुंबईत येऊन उपचार घेण्याचा विचार केला. सुमानिया यांच्यावर मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालायातील डॉक्टरांनी तातडीनं उपचार सुरू केले. केवळ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सुमानिया यांना नव्यानं आयुष्य मिळालंय.
सुमानिया यांना २००९ मध्ये टीबीचं निदान करण्यात आलं होतं. फुफ्फुसाचा टीबी असल्यानं गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचा छातीतही वेदना सुरू झाल्या. त्यांच्या छातीतून पू निघत असल्याने नाकपुडीद्वारे एक कायमस्वरूपी नळी बसवली होती. शिवाय गेले सहा महिने ते अंथरूणातच खिळून होते. अखेर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सुमानिया आणि त्यांच्या पत्नीनं मुंबईत उपचार घेण्याचं ठरवलं. त्यानुसार सुमानिया मुंबईतील वोक्हार्ट रूग्णालयात दाखल झाले.
वोक्हार्ट रुग्णालयातील हृदयविकार शल्यचिकित्सक डॉ. सुहास पारीख यांनी सांगितलं की, “सुमानिया यांची प्रकृती फार बिघडली होती. त्यांच्या छातीत पू झाला होता त्यामुळे दरदिवशी २०० मिलिमीटर पू बाहेर काढावा लागायचा. टीबीच्या विषाणूंमुळे डावीकडील फुफ्फुस निकामी झाला होता. त्यामुळे फुफ्फुस काढल्याशिवाय पर्याय नव्हता. पण शस्त्रक्रियेद्वारे आम्ही 15 दिवसात फुफ्फुसांत जमा झालेला पू काढला. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून गेल्या आठवड्यात सुमानियाला डिस्चार्जही देण्यात आलाय’’
‘‘भारतातील एक तृतीयांश लोकांच्या शरीरात टीबीचे जंतू असतात, पण या सर्वांनाच टीबी होत नाही. याचे कारण हे जंतू पुरेसे सक्षम नसतात. मात्र रोगप्रतिकारशक्ती कमी झाली तर व्यक्तीला क्षयाची लागण होते. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टीक आहार घेणं गरजेचं असतं. तर क्षयाची लक्षणं आढळून आल्यास त्यावर तातडीनं निदान आणि उपचार घेणं अतिशय आवश्यक आहे’’ असंही डॉ. पारीख यांनी सांगितलं.
पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात वैद्यकीय उपचार परवडणाऱ्या दरात आणि स्वस्त आहेत. त्यामुळे भारतामध्ये उपचारांसाठी येणाऱ्या परदेशी व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. २०१४च्या तुलनेत २०१६मध्ये भारतात उपचारांसाठी येणाऱ्यांची संख्या अडीच लाखांनी वाढलीये. ही संख्या अजून वाढवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे परयत्न सुरु आहेत.