उन्हाळा आला की घाम, डिहायड्रेशन, अनेक आजार, सनबर्न, केसांच्या समस्या उद्भवतात. उन्हाळ्याच्या दिवसांत सूर्याच्या किरणांमुळे अवयव, त्वचा आणि केसांवर परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्यायची याबाबत तज्ज्ञांनी आपल्याला माहिती दिलीये.
यासंदर्भात क्युटीस स्किन स्टुडियोच्या लेसर सर्जन आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अप्रतिम गोयल म्हणाल्या की, “वातावरणातील गरमीने आणि आर्द्रतेने त्वचा टॅन होणं, पुरळ उठणं, ब्लॅकहेड्स या तक्रारी येतात. सूर्याची किरणं जेव्हा आपल्या त्वचेत प्रवेश करतात त्यावेळी फ्री रॅडीकल्स तयार होतात. यामुळे त्वचा सुरकुतणे तसंच फंगल इन्फेक्शन सारख्या समस्या उद्भवतात.”
डॉ. गोयल पुढे म्हणाल्या की, “उन्हामुळे आलेल्या घामामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता असते. केसात कोंडा होणं हे केसांच्या त्वचेसाठी हानिकारक असून यामुळे डोक्यात खाज येणं आणि केसगळती होऊ शकते.”
त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी डॉ. गोयल यांनी दिलेल्या टीप्स
- थंड पाण्याने अंघोळ करा
- सोप-फ्री फेसवॉशचा वापर करा
- घट्ट कपडे घालू नका
- घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करा
- उन्हात फिरताना टोपी, स्कार्फ, ग्लोव्हज आणि छत्रीचा वापर करा
- भरपूर पाणी प्या
- नियमित केस धुवा
- केस धुण्यापूर्वी लिंबाचा रस, दही केसांच्या त्वचेवर लावा
त्वचा क्लिनिकचे संचालक आणि कॉस्मेटोलॉजीस्ट डॉ. अमित कारखानीस म्हणाले की, “चेहऱ्यावर किंवा त्वचेवर केमिकल उत्पादनांचा, मेकअपचा वापर करू नका. केसांना शक्यतो ब्लो-ड्राय करू नका. यासोबतच योग्य आहार घ्या.”