कोणताही खेळ म्हटला की फिटनेस महत्त्वाचाच. ताकद, स्पीड आणि एकाग्रता यासाठी फक्त शरीरानेच नाही तर मनानेही फीट रहावं लागतं. क्रिकेटमध्ये तासनतास फिल्डवर उभं राहण्यासाठी स्टॅमिना आणि एनर्जी लेव्हल जरूरी असते. बॅटींग करताना ‘रनिंग बिटवीन द विकेट्स’ साठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो.
महाराष्ट्राची मराठीमोळी रणरागिणी पूनम राऊतही महिला क्रिकेटर्ससाठी एक आयकॉन आहे. पूनम आज स्वत: तिच्या फीटनेसचं रहस्य उलगडून सांगणार आहे.
फिटनेसविषयी सांगताना पूनम म्हणते, “क्रिकेट हा असा खेळ आहे की जिथे तुम्हाला शारीरिक फीट आणि एनर्जेटीक असणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रॅक्टिससोबत व्यायामही करावा लागतो. तुमचा अनुभव आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की सगळं उत्तमरित्या जुळून येतं. मॅचप्रमाणे फीटनेसचं स्वरूप बदलतं.”
पूनम पुढे म्हणते, “फिटनेमध्ये आम्हाला एन्डुरन्स, हॅन्ड-आय कॉर्डिनेशन, सामर्थ्य आणि ताकद ठेवणं या गोष्टी फॉलो कराव्या लागतात.”
प्रत्येक खेळाडूला फीटनेस लेवल खूप चांगली ठेवावी लागते. खेळताना फीटनेचा कसा उपयोग होतो हे सांगताना पूनम म्हणाली की, “क्रिजवर टिकून राहण्यासाठी फीटनेस अत्यंत गरजेचा आहे. एकावेळी मी आणि दिप्तीने रेकॉर्डब्रेक इनिंग खेळली होती. ४५ ओव्हर आम्ही खेळलो होतो. त्यावेळी विकेट न पडता इतका वेळ क्रिजवर राहणं कठीण असतं. मात्र त्यावेळी आमचा स्टॅमिना, वेग (स्पीड) आणि फीटनेस या गोष्टी कामी आल्या.”
पण, फीट राहण्यासाठी स्टॅमिना ठेवण्यासाठी शारीरिक फिटनेस प्रमाणेच मानसिकदृष्ट्याही फीट राहणं महत्त्वाचं आहे. मानसिकदृष्या फीट ठेवण्यासाठी पूनम योगा आणि मेडिटेशनवर अधिक भर देते.
योग आणि मेडिटेशनचा फायदा,
- रोज सकाळी उठून योगा
- प्रॅक्टिस आधी रोजचा व्यायाम
- रात्री झोपण्यापूर्वी १०-१५ मिनिटं मेडिटेशन
योगा आणि मेडिशनच्या फायद्याविषयी सांगताना पूनम म्हणाली की, “एकवेळ अशी होती की मला टीममधून वगळण्यात आलं होतं. त्यावेळी माझं टीममध्ये कमबॅक करणंही कठीण झालं होतं. मनासारख्या गोष्टी न झाल्याने डोक्यात नकारात्मक विचार सुरू होते. अशा वेळी मला योगा आणि मेडिटेशनचा खूप फायदा झाला. त्यावेळी मी पहाटे ४-६ यावेळेत दररोज प्राणायम करायची. यामुळे नक्कीच माझ्या खेळात खूप सुधारणा झाली.”
मानसिक आणि शारीरिक फीटनेस सोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार.
पूनम राऊतचा आहार,
- ग्लुटेन फ्री डाएट
- जेवणाच्या तीन वेळा
- सकाळी ९, दुपारी १ आणि संध्याकाळी ६ वाजता जेवण
- जेवणात प्रोटीन (प्रथिनं) आणि कार्बचं प्रमाण जास्त
- मासे, चिकन, भात, पोळी, सुकामेवा
- साखर आणि साखरयुक्त पदार्थ अजिबात नाही
- मॅचच्या दिवशी शरीरासाठी योग्य ते सर्व खातो
जंक फूडबद्दल विचारल्यावर हसत-हसत पूनमने सांगितलं की, “रविवारी हा चीट डे आहे. त्या दिवशी थोडं जंक फूड खाते. माझ्या मते व्यक्तीने एखाद्या गोष्टीवर अतिप्रमाण नियंत्रण ठेवलं तर त्याला कंटाळा येतो आणि काहीवेळा ते नियंत्रण सुटतं. त्यामुळे मला जे खावसं वाटतं ते मी रविवारी बिंधास्त खाते.”