हृदयाला जपा असं डॉक्टरांकडून नेहमी सांगण्यात येतं. यासाठी आपण पथ्य पाळतो, दररोज व्यायाम करतो. चुकीचा आहार आणि व्यायमाचा अभाव यामुळे हृदयाचं आरोग्य धोक्यात येतं. मात्र फक्त य़ाच गोष्टींमुळे नव्हे तर इतर गोष्टींमुळे देखील हृदयाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे हृदयाला हानिकारक ठरणाऱ्या इतर गोष्टी देखील जाणून घेतल्या पाहिजेत.
या गोष्टींमुळे हृदयाचं आरोग्य धोक्यात येतं
हिरड्यांच्या समस्या
ज्या व्यक्तींना हिरड्यांच्या समस्या असतात त्यांना हृदयाचे आजार होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हिरड्यांच्या समस्यांमुळे दातात जंतू तयार होतात. हे जंतू शरीरातील रक्तात मिळून हृदयाला तसंच हृदयाच्या रक्तवाहिन्यांना धोकादायक ठरू शकतात. यासाठी दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
शिफ्टमध्ये काम केल्याने
प्रमाणापेक्षा जास्त काळ काम केल्याने हृदयावर ताण येतो आणि हृदयाच्या समस्या उद्भवतात. कॅनडातील वेस्टन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार, शिफ्टमध्ये काम केल्याने शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. ज्यामुळे हृदयाला धोका निर्माण होतो. जर तुम्ही दररोज ठरलेले तास काम करत नसाल तर कमीत कमी व्यायाम, संतुलित आहार आणि नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
अकाली रोजनिवृत्ती
जर महिलांना वेळेच्या आधी म्हणजे वयाच्या 46व्या वर्षी जर रजोनिवृत्ती आली तर त्या महिलांना हृदयाच्या आजारांचा मोठा धोका असतो. शिवाय अशा महिलांना स्ट्रोक येण्याचा धोकाही दुप्पट असतो. हृदयाचे आजार संभवण्याचं कारण म्हणजे रजोनिवृत्ती नंतर महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी होते. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्यस महिलांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्लिप अॅप्निया
जर तुम्ही रात्री झोपेत मोठ्याने घोरत असाल तर तुम्हाला स्लिप अॅप्निया ही समस्या असण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, स्लिप अॅप्निया या समस्येचा संबंध हा हृदयाचे ठोके, स्ट्रोक आणि हार्ट फेल होण्याशी असतो. मात्र स्लिप अॅप्नियावर वेळीच उपचार केल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते.
चांगली झोप न मिळणं
जेव्हा तुम्ही 6 तासांपेक्षा कमी झोप घेता त्यावेळी तुम्हाला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता असते. आणि हे दोन्ही गंभीर आजार हृदयाच्या आजाराशी निगडीत आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अधिकवेळ झोपू शकता. कारण जास्त काळ झोपल्याने स्ट्रोकचा धोका संभवतो. त्यामुळे माणसाने केवळ 9 तास झोप घ्यावी.
लठ्ठपणा
अतिरक्त वजन असणं हे देखील हृदयाच्या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतं. लठ्ठपणामुळे शरीरात केमिकल्स तयार होतात. हे केमिकल्स रक्तदाब, हृदयाच्य रक्तवाहिन्या आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीसाठी घातक ठरतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायाम आणि आहाराची पथ्य पाळावी.