वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आणि त्यानंतर एक वर्ष त्याचं किंवा अन्य सरकारी रुग्णालयात इंटर्नशीप करणार्या निवासी डॉक्टरांना, रुग्णालयाच्या वसतीगृहात राहण्याची सोय करून दिलेली असते. पण, पोद्दार आयुर्वेदीक महाविद्यालय प्रशासनाने प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहता येणार नाही असा निर्णय घेतलाय.
पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात परवडणाऱ्या दरात शिक्षण मिळत असल्याने सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर यांसारख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नाही. तर मणिपूर, नेपाळ मधूनही विद्यार्थी शिक्षणासाठी आहेत. मात्र कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता महाविद्यालयाने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात आंदोलन सुरू केलंय.
यासंदर्भात बोलताना आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगितले की, ९ फेब्रुवारी पासून आम्हाला पत्र पाठवून वसतीगृह रिकामी करण्याचे आदेश दिलेत. हे नियमांच्या विरोधात आहे. याबाबत अधिष्ठातांना भेटलो. पण त्यांनी अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे विविध ठिकाणाहून आलेले विद्यार्थी कुठे जाणार असा प्रश्न ही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
या आंदोलनात पोद्दार आयुर्वेदीक कॉलेजच्या पहिल्या, द्वितीय आणि तृतीय वर्षातील तसेच इंटर्न असे ३०० विद्यार्थी सहभागी झालेत.
याप्रकरणी माय मेडिकल मंत्राने पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. गोविंद खटे यांना विचारलं असता विद्यार्थी आंदोलन करतायेत याबाबत मला काहीचं माहिती नसल्याचं सांगत उत्तर देण्यास नकार दिला.
विद्यार्थ्यांच्या मागण्या
- वसतीगृहाची क्षमता केवळ ६४ विद्यार्थ्यांची आहे. परंतु पहिल्या वर्षात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला
- पोद्दार रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे भरूनही वसतीगृह रिकामं करण्याचे आदेश
- भटक्या जाती आणि जमातीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे वसतीगृहात राहता येणार नसल्याचा अधिष्ठातांचा आदेश
- पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाच्या प्रशिक्षणासाठी अजूनही शवाची व्यवस्था नाही