मुंबईतील आयुर्वेदीक पोद्दार महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टरांच्या संपाला आता वेगळंच वळणं लागलंय. रॅगिंगच्या आरोपांमुळे १२ इंटर्न डॉक्टरांना हॉस्टेल सोडण्याची नोटीस दिल्याचा खुलासा पोद्दार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गोविंद खटी यांनी केलाय. डॉ. खटी यांनी इंटर्न डॉक्टरांचे आरोप फेटाळून लावलेत.
इंटर्न डॉक्टरांनी हॉस्टेल रिकामं करावं, अशी नोटीस प्रशासनाने दिल्याच्या विरोधात गेले तीन दिवस डॉक्टर संपावर आहेत. गेले तीन दिवस इंटर्न डॉक्टर रुग्णालयाच्या आवारात आंदोलनाला बसलेत.
माय मेडिकल मंत्राशी बोलताना पोद्दार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गोविंद खटी म्हणाले, की, ‘‘इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये राहता येणार नाही, असं सांगून पुकारण्यात आलेल्या संपाचं कारण मुळात वेगळंच आहे. नोव्हेंबरमध्ये महाविद्यालय सुरू झालं. त्यानंतर रॅगिगचं प्रकरणं समोर आलं. चौकशी समितीने तीन महिने तपास केला. यात इंटर्नशिप करणारे १२ डॉक्टर दोषी असल्याचं आढळून आलं. या चौकशीदरम्यान असं लक्षात आलं की, नियमानुसार इंटर्नशिप करणारे डॉक्टर हॉस्टेलमध्ये राहू शकत नाहीत.’’
डॉ. खटी पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांचं करिअर बिघडू नये, म्हणून त्यांना लेखी पत्र पाठवून तातडीनं हॉस्टेल शोधण्यास सांगण्यात आलंय. पण, या घटनेला चुकीच्या पद्धतीनं लोकांसमोर आणलं जातंय. आयुर्वेद महाविद्यालयाची प्रतिमा मलिन होऊ नये, याकरता मी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र सत्य घटना लोकांसमोर येणं गरजेचं आहे.”
डॉक्टरांच्या या संपाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत गुरूवारी बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व कागदपत्र सादर केली जातील, अशी माहिती डॉ. खटी यांनी दिली.
इतकंच नाहीतर पुढे बोलताना डॉ. गोविंद खटी म्हणाले की, “शिक्षण पूर्ण केल्यानंतर या मुलांना ग्रामीण भागात एक वर्ष सेवा द्यावी लागते. परंतु, ही मुलं गावखेड्यात इंटर्नशिप न करता मुंबईत धाव घेतात. परंतु, तरीही हॉस्टेलमध्ये त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आलीये. इतकंच नाहीतर रॅगिग करणाऱ्या डॉक्टरांना हॉस्टेल तातडीनं खाली करण्यास सांगितलं आहे. सर्वांना नाही.”
महाविद्यालयात रॅगिगचं प्रकरण घडून फार दिवस झालेत. यात दोषी डॉक्टारांना हॉस्टेलमधून काढून टाकण्यात आलंय. आता अधिष्ठातांकडे बोलायला काहीच नसल्यानं अशाप्रकारचं कारणं पुढे करत असल्याचं माय मेडिकल मंत्राशी बोलताना एका विद्यार्थीनीने म्हटलंय.’