टीबीमुक्त भारत घडवण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठीच जागतिक टीबी दिनाचं औचित्य साधून फॉर्मासिस्ट आणि औषध विक्रेत्यांनी भारताला क्षयमुक्त करण्यासाठी एकत्र येऊया अशी प्रतिज्ञा घेतलीये. पनवेल तालुक्यातील सर्व फार्मासिस्ट आणि केमिस्ट यांच्यासाठी क्षयरोग निर्मूलन परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं. कामोठेच्या एमजीएम रुग्णालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आलेलं.
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे सदस्य संतोष घोडींदे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमाला पनवेल, खांदाकॉलनी, कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा परिसरातील एकूण 170 फार्मासिस्ट आणि केमिस्ट सहभागी झाले होते. यावेळी रायगडचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांच्यासह अनेक फॉर्मासिस्ट नं क्षयरोग निर्मुलन बाबत मार्गदर्धन केलं.
फार्मासिस्ट आणि डॉक्टरांनी आपल्याकडील टीबी रुग्णांची माहिती सरकारला कळवणं बंधनकारक केलंय. त्यामुळे या परिषदेत, टीबीग्रस्त रूग्णांची माहिती कशी नोंद करून ठेवायची, जवळच्या परिसरातील थुंकी तपासणी केंद्र आणि यासंबंधी टेस्ट केंद्र कुठे आहेत, याबाबत रूग्णांना मार्गदर्शन कसं करावं शिवाय त्यांना फार्मासिस्ट मार्फत सरकारी मोफत औषधे कशी पुरवावी या सर्व गोष्टींचं पीपीटीद्वारे मार्गदर्शन करण्यात आलंय.
रायगड विभागातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे(IMA) अध्यक्ष डॉ गिरीश गुणे यांनी सांगितलं की, “क्षय मुक्तीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास भारतातून क्षयरोग 2025 पुर्वीच हद्दपार करणं शक्य होईल.”
तर रायगड विभागाच्या अन्न आणि औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त गिरीश हुकरे यांच्या सांगण्यानुसार, फार्मासिस्ट हा आरोग्यसेवेचा कणा आहे. त्यामुळे कायद्याचे योग्य पालन करून फार्मासिस्ट समाजसेवी कार्याचा भाग बनू शकतो आणि हे देशसेवी कार्य करू शकतो.
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशचे उपाध्यक्ष मंजिरी घरत गेल्या अनेक वर्षांपासून फॉर्मासिस्ट यांना क्षयरुग्णांवर कसं उपचार आणि मार्गदर्शन करायचं याबाबत प्रशिक्षण देतात. त्यानुसार आता सरकारनं क्षयरुग्णांना शोधण्यासाठी फॉर्मासिस्टची घेत असलेल्या मदतीची सविस्तर माहिती दिलीये.