२४ मार्च हा दिवस, जागतिक टीबी दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘टीबी’वर मात करता येणं शक्य आहे. पण, यासाठी योग्य उपचारांसोबत पौष्टीक आहाराची गरज असते. पौष्टीक आहार मिळाला नाही, तर औषधांचा विषाणूंवर होणारा परिणाम कमी होतो. परिणामी रुग्णांचं शरीर खचत जातं.
डॉक्टरांना रुग्णांनी पौष्टीक आहार घेतलाय का नाही? रुग्ण शरीराला टीबीशी लढण्यासाठी हवा असणारा पौष्टीक खातायत का नाही याची माहिती तात्काळ मिळावी यासाठी मैंगलोरच्या येनेपोया विद्यापीठाने, कॅनडाच्या मॅकगिल टीबीसेंटर सोबत संयुक्तरित्या एक अॅप तयार केलंय. या अॅपच्या मदतीने रुग्णाने पौष्टीक आहार घेतलाय का नाही याची माहिती डॉक्टरांना एका क्लिकवर मिळेल, आणि डॉक्टर रुग्णांचं समुपदेशन करू शकतील.
येनेपोया विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अनुराग भार्गव यांच्या माहितीप्रमाणे, गेल्याच आठवड्यात दिल्लीत पार पडलेल्या जगभरातील टीबीतज्ज्ञांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अॅपचं अनावरणं केलं होतं. या अॅपला जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतीय विभागाने मान्यता दिलीये.
या अॅपच्या माध्यमातून काय माहिती मिळणार,
- टीबीचे उपचार सुरु असताना रुग्णाचं वजन किती असावं. जेणेकरून उपचारांसाठी फायदा होईल
- रुग्णाला गरजेच्या कॅलरी आणि प्रोटीन्सचं रुग्णाने सेवन केलंय का
- रुग्णाचा आहार किंवा डाएट कसं असावं याबाबत समुपदेशन
- बाजारात महाग मिळणाऱ्या पौष्टीक अन्नापेक्षा आपल्या सहजतेने मिळू शकतील अशा पौष्टीक पदार्थांची माहीती
- जीवनशैली आणि व्यायामाबाबत माहिती
- गुगल प्ले-स्टोअरवरून हे अॅप मोफत डाउनलोड करता येणं शक्य
भारतात दरवर्षी ४ लाख लोकांचा टीबीमुळे मृत्यू होतो, तर २९ लाख नवीन प्रकरणं दरवर्षी समोर येतात. पौष्टीक अन्नाचं सेवन न केल्याने रुग्णांच्या शरीरावर याचा परिणाम होतो. ज्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता दाट असते.
टीबीमध्ये रुग्णाचं वजन झपाट्याने कमी होतं. शरीराला पौष्टीक घटक मिळाले नाहीत तर रुग्णाचं वजन खूप कमी होतं ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. भारतातील ५० टक्के पुरुष आणि महिला रुग्णांचं वजन फक्त ४२ आणि ३८ किलो आहे. ग्रामीण भागामध्ये खूप कमी बॉडी मास इंडेक्स पहायला मिळतो.
या अॅपबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना येनेपोया विद्यापीठाचे प्राध्यपक डॉ. अनुुराग भार्गव म्हणतात, “या अॅपमुळे टीबी रुग्णांना आरोग्यसेवा पुरवणारे डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांना खूप फायदा होणार आहे. रुग्णाने पौष्टीक अन्नाचे सेवन केलं का नाही आणि शारीरिक परिस्थिती कशी आहे याबाबत माहिती मिळणं शक्य होणारे. एखाद्या रुग्णाचा बॉडी मास इंडेक्स खूप कमी असला तर हे अॅप एक सिग्नल पाठवेल.”
जगभरातून टीबीला हद्दपार करण्यासाठी डॉक्टर विविध मार्गांनी प्रयत्न करतायत. भारताने देशातून टीबीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी २०२५ पर्यंतचं लक्ष ठेवलंय.