आता महिलांप्रमाणे लवकरच पुरुषांनासाठी देखील गर्भनिरोधक गोळी उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी संतती नियमनासाठी खास पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी तयार केलीये. डिमेथॅनड्रोलोन अनडिकॅनोट (डीएमएयू) असं या गोळीच नावं आहे.
संशोधकांच्या सांगण्यानुसार, पुरूषांना ही गोळी तोंडावाटे घ्यावी लागेल. या गोळीमुळे शरीरावर कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत. शिवाय पुरूषांसाठी असणारी ही गोळी महिलांकरिता असलेल्या गर्भनिरोधक गोळीसारखीच असेल. स्कूल ऑफ मेडिसीन विद्यापीठाचे प्राध्यापक स्टिफनी पेज यांनी याबाबत संशोधन केलं. शिकागोमध्ये झालेल्या एंडोक्रोनिक सोसायटी-२०१८ या परिषदेत पेज यांनी हे संशोधन सादर केलं.
यासंदर्भात प्रा. स्टिफनी पेज म्हणाल्या, “पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याकडे इंजेक्शनचा पर्याय उपलब्ध आहे. पुरूष नसबंदीसाठीही इंजेक्शन दिलं जातं. परंतु गर्भनिरोधकासाठी खूपच कमी पुरूष यासाठी पुढाकार घेतात. म्हणूनच आम्ही महिलांप्रमाणे पुरूषांसाठी गर्भनिरोधक गोळी बनवली.”
या गर्भनिरोधक गोळीचा १८ ते ५० वयोगटातल्या १०० पुरूषांवर प्रयोग करण्यात आला. महिलांप्रमाणेच पुरूषांनाही दररोज ही गोळी घेण्यास सांगितली. ही गोळी घेतल्यानंतर ८३ पुरुषांमध्ये स्पर्म्स तयार होण्यासाठी कारणीभूत असणारे टेस्टोस्टोरट आणि इतर हार्मोन्सची पातळी कमी झालेली आढळली.
पेज पुढे म्हणाल्या की, “पुरूषांच्या शरीरात प्रत्येक मिनिटाला १००० शुक्राणू तयार होतात. तर स्त्रियांच्या अंडाशयात एक-दोन स्त्रीबीज तयार होण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागतो. त्यामुळे पुरूषांच्या फलन प्रक्रियेवर नियंत्रण मिळवणं आमच्यासाठी हे एक मोठं आव्हान आहे. शिवाय आम्ही केलेल्या सर्वेक्षणात पुरूषांनी इंजेक्शनमुळे साईट्स इफेक्ट होत असल्याचं सांगितलं. त्यामुळे गोळ्यांचा हा पर्याय उत्तम ठरू शकतो.”
यासंदर्भात बोलताना मुंबई पालिकेतील कुटुंब कल्याण नियोजनाच्या प्रमुख अधिकारी डॉ. आशा अडवानी यांनी सांगितलं की, “अजूनही पुरुष नसबंदी करण्यास तयार होत नाहीत. वाढत्या लोकसंख्येवर मात कऱण्यासाठी कुटुंब नियोजन उपक्रमाद्वारे नसबंदीबाबत जागरूकता निर्माण केली जातेय. अजूनही भारतात पुरूषांच्या गर्भनिरोधक गोळ्यांचा पर्य़ाय उपलब्ध नाही. हा पर्याय उपलब्ध झाल्यास नक्कीच याचा कुटुंब नियोजनासाठी फायदाच होईल.”
जे.जे.रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक आनंद म्हणाले, “संतती नियमनासाठी अजून आपल्याकडे पुरूषांसाठी कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही. परदेशात यासाठी तोंडावाटे घेणारं औषध तयार करण्यात आलंय मात्र यालाही काही कालावधी लागेल. कारण हे औषध सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर असेल. त्यानंतर याचं क्लिनिकल ट्रायल झाल्यानंतर याचा कितपत फायदा होतोय हे समजेल.”