देशभरात किडनी विकाराने ग्रस्त लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना किडनी विकार होतायत. देशभरात खासकरून शहरी भागात राहणाऱ्या १७ टक्के लोकांना किडनी विकार असल्याचं समोर आलंंय. जेवणात मीठाचं प्रमाण जास्त असल्यानेही किडनी विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरातील १५० किडनीविकारतज्ज्ञांनी एकत्र येऊन किडनी विकारांबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.
या सर्व किडनीविकारतज्ज्ञांनी एकत्र येऊन ‘एक चम्मच कम’ म्हणजेच एक चमचा कमी अशी मोहीम सुरू केलीये. लोकांनी आहारात मीठाचं प्रमाण कमी करावं यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. भारतीय व्यक्ती मोठ्या प्रमाणावर जेवणात मीठाचा वापर करतात यासाठीच जनजागृती म्हणून ही मोहीम सुरू करण्याचं डॉक्टरांनी ठरवलंय. डॉ. भूपेंद्र गांधी यांच्या अमर गांघी फाउंडेशन आणि मुंबई किडनी फाउंडेशनने ही मोहीम सुरू केलीये.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार,
- जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात ३० वर्षावरील ८ ते १६ टक्के प्रौढांना किडनीचा आजार आहे
- डॉ. अजय सिंह यांच्या संशोधनानुसार देशभरात शहरी भागात १७ टक्के लोकं किडनी विकाराने ग्रस्त
- भारतात किडनी विकाराने ग्रस्त लोकांपैकी ६० टक्के व्यक्ती मधुमेह किंवा हायपरटेन्शनने आजारी
- मधुमेह किडनी विकाराचं प्रमुख कारण. भारतात ७० लाखांच्या आसपास टाईप-२ मधुमेही. २०४० पर्यंत ही संख्या १४० लाखांपर्यंत पोहोचण्याची भीती. असं झालं तर ३० ते ४० टक्के लोकांना किडनी विकार होण्याची शक्यता
- लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शनही किडनी विकार होण्यास कारणीभूत
अमर गांधी फाउंडेशनचे डॉ. भूपेंद्र गांधी माय मेडिकल मंत्राशी बोलताना म्हणतात, “किडनी विकार हा एक सायलेंट किलर आहे. याची लक्षणं सहसा आढळून येत नाहीत. किडनी आजार अगदी शेवटच्या टप्प्यात ओळखू येतात. अशा वेळी रुग्णाकडे फार जास्त पर्याय उपलब्ध नसतात.”
तर मुंबई किडनी फाउंडेशनचे किडनी विकारतज्ज्ञ डॉ. उमेश खन्ना म्हणतात, “महिलांना खासकरून बाहेरचं खाण्याची जास्त सवय असते. काहीतरी चटपटीत म्हणून महिला बाहेरचं खातात. पण, यात खूर जास्त प्रमाणात मीठ असतं. ज्यामुळे महिलांनी मीठ खाण्याबाबत काळजी घेतली पाहिजे.”
तर, प्रसिद्ध किडनी विकारतज्ज्ञ डॉ. भावेश वोरा यांच्या सांगण्याप्रमाणे, “मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयविकार आणि लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्याने किडनीविकार होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे असंसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांनी वेळोवेळी किडनीची तपासणी केली पाहिेजे.”