महाराष्ट्रात महिलांमध्ये आढळून येणाऱ्या कर्करोगामध्ये सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक आहे. कर्करोगावरील उपचारांचा खर्च परवडण्याजोगा नसल्यानं बहुतांश महिला आजाराकडे दुर्लक्ष करतात. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांमध्ये ब्रेस्ट आणि सर्व्हायकल कॅन्सरचं निदान वेळेवर व्हावं आणि उपचार सुरू करता यावेत यासाठी ८ मार्च या ‘जागतिक महिला दिना’ निमित्त राज्यभरात ‘कॅन्सर स्किनिंग प्रोग्राम’ राबवण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,
- जिल्हा आणि तालुका पातळीवर जनजागृतीसाठी कार्यक्रम आयोजित करणार
- सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयं, दंत महाविद्यालयं, आयुर्वेद महाविद्यालयं, होमिओपॅथी महाविद्यालयांमध्ये जनजागृती, तपासणी मोफत करण्यात येईल
यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जाधव यांनी सांगितलं, “महिलांमध्ये वाढत्या कर्करोगाचं प्रमाण लक्षात घेता जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभरात कॅन्सर तपासणीचा उपक्रम राबवला जाणार आहे. साधारणतः मुंबईसह महाराष्ट्रातील एक लाख महिलांची तपासणी करण्याचा यामागील उद्देश आहे.”
या उपक्रमात,
- ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सरसाठी महिलांचं स्क्रिनिंग होईल
- मॅमोग्राफी, पॅप स्मेअर टेस्ट, बोन डेन्सिटी तपासली जाईल
- कर्करोगाचं निदान झालेल्या महिलांना पुढील उपचार मुंबईतील कामा रुग्णालयात पाठवलं जाईल
यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना आयुष मंत्रालयाच्या संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. गोविंद खटी यांनी सांगितलं की, ‘स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग महिलांमध्ये सर्वांधिक असल्याचं समोर आलंय. वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यानं रुग्ण दगावतोय. यामागील मुख्य कारणं कर्करोगाबाबत असणाऱ्या जागरूकतेचा अभाव आहे.”
गेल्या वर्षी सरकारनं राज्यभरात कॅन्सर चाचण्यांसाठी शिबिरांच आयोजन केलं होतं. त्यानंतर आता कॅन्सरमुक्त भारत घडवण्यासाठी महिलांची कॅन्सर चाचणी करण्यासाठी नवा उपक्रम राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.