होमिओपॅथी उपचार पद्धती जगभरात प्रचंड प्रसिद्ध आहे. जर्मनीमध्ये १७९६ मध्ये होमिओपॅथीचा शोध लागला. त्यानंतर जगभरात वेगानं ही प्रसिद्ध झाली. भारतात एकोणिसाव्या शतकात होमिओपॅथीचा प्रवेश झाला. भारतात रोमॅनियन डॉक्टर जॉन मार्टिन होनिंगबर्गरच्या माध्यमातून होमिओपॅथीनं प्रवेश घेतला. लाहोरचे महाराज रणजित सिंग अर्धांगवायूनं आजारी होते. त्यांच्यावर १८३५ साली डॉ. जॉन यांनी उपचार केले. या उपचारांनी महाराज बरे झाले. यानंतर हळूहळू ब्रिटीशांच्या गुलामीत असलेल्या भारतात होमिओपॅथीचा प्रसार झाला.
प्रथम बंगालमध्ये होमिओपॅथीचा प्रसार झाला. त्यानंतर हळूहळू भारतभर होमिओपॅथीला प्रसिद्धी मिळाली. सुरुवातीला, फौजांमध्ये नवशिक्यांकडून होमिओपॅथाची औषधं दिली जायची. यातील बहूतांश जणांनी या पद्धतीचं योग्य शिक्षण घेतलं नव्हतं. महेंद्र लाल सिरकार हे भारतातले होमिओपॅथीचे पहिले डॉक्टर बनले. यानंतर होमिपॅथीला मिळणारा प्रतिसाद पाहून अनेक अॅलोपेथी डॉक्टरांनी होमिपॅथीची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. होमिपॅथीच्या शिक्षणासाठी १८८१ साली भारतातलं पहिलं होमिओपॅथी कॉलेज कोलकात्यात सुरु झालं. बंगालमध्ये सुरु झालेल्या या संस्थेचं ‘कलकत्ता होमिपॅथी मेडिकल कॉलेज’, असं नामकरण करण्यात आलं. भारतात होमिओपॅथी लोकप्रिय करण्यामागे ‘कलकत्ता होमिपॅथी मेडिकल कॉलेज’चा मोठा वाटा आहे.
१९७३ साली भारत सरकारनं, होमिओपॅथीचा राष्ट्रीय स्तरावर उपचार पद्धती म्हणून स्विकार केला. यानंतर, ‘सेंट्रल काउन्सिल अॉफ होमिओपॅथी’ची स्थापना करण्यात आली. होमिओपॅथीचं शिक्षण आणि प्रॅक्टिस यांवर नियंत्रण ठेवणं यामागचा उद्देश होता. सध्या अॅलोपॅथी आणि आयुर्वेदानंतर, होमिओपॅथीचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. भारतात सध्या जवळपास २ लाखांहून अधिक नोंद असलेले होमिओपॅथी डॉक्टर आहेत आणि यामध्ये दरवर्षी १२ हजार डॅक्टरांची भर पडते.