प्रेम आणि लग्न या दोन्ही एकमेकांशी निगडित गोष्टी आहेत. पण नव्या पिढीचा लग्न संस्थेत फारसा विश्वास राहिलेला दिसत नाही. ते नेहमीच नवनव्या जोडीदाराच्या शोधात असतात. पण असे असले तरी, आपला जोडीदार प्रामाणिक असावा ही माफक अपेक्षा सर्वांना असते. पण कधी कधी असा क्षण येतो की, आपल्याला जोडीदाराने फसवल्याचे समजते.
टेनेसी विद्यापीठाने याबाबत केलेला अभ्यास जर्नल ऑफ सेक्स रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. यानुसार जोडीदाराने धोका देण्याची दोन कारणं समोर आली आहेत. एकतर, जोडीदार शारीरिक गरजा पूर्ण करत नसेल, किंवा अधिक स्वातंत्र हवंय असं वाटत असेल तर.
या संशोधनात सरासरी २२ वय असणाऱ्या १०४ जणांचं सहा महिने निरीक्षण करण्यात आलं. यात ५९.६ टक्के महिलांचा समावेश होता. या सर्वांकडून मिळवलेल्या माहितीनुसार, यातील बऱ्याच जणांनी भूतकाळात आपल्या जोडीदाराची फसवणूक केल्याचं कबूल केलं.
एखाद्यावेळी जेव्हा तुम्हाला मित्राची/मैत्रिणीची गरज असते. पण ती गरज तुमचा जोडीदार पूर्ण करू शकत नाही, जोडीदारासोबतचा संवाद तितका प्रभावी नसतो, अशावेळी तुम्ही भावना व्यक्त करण्यासाठी इतरत्र शोध घेता. हीच ती वेळ जेव्हा तुम्ही जोडीदाराला धोका देता.
असाच दुसरा प्रकार आहे, स्वातंत्र्य. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७३ टक्के लोकांना स्वातंत्र्य हवे होते. तर काही लोकांनी आपण एखाद्या नशेच्या क्षणी आपल्या जोडीदारास फसवल्याचं कबूल केलं. मद्य पिऊन, समोरच्याबद्दल वाटणारं आकर्षण, कुतूहल यामुळे त्यांनी आपल्या जोडीदाराला धोका दिला.
आजची पिढी नात्यांच्या बाबतीत फारच फास्ट झालीय. ते लगेचच नाती बदलताना दिसतात. जुनी पिढी हळूवार नाती उलघडत होती. त्यापेक्षा नवी पिढी जलद गतीने पुढे जातेय. यासाठी ते त्यांच्या पालकांच्या घरातून बाहेर पडताहेत. आपल्या गरजा मित्र/मैत्रिणींकडून पूर्ण करताहेत. गरजा असा संबंधातून पूर्ण होत असल्याने नव्या पिढीला लग्नाची घाई नाही.
पूर्वी नातेसंबंधात दुरावा आल्यास चिंता वाटायची, पण आता असे काही होत नाही. आपल्याला खरेतर नात्यांमधील दुराव्याची कारणे शोधली पाहिजेत.
अभ्यासात असेही लक्षात आले आहे की, नव्या पिढीला स्वत:च्या गरजांची जाणीव आहे. यासाठी ते अनेकदा गरजा पूर्ण करणाऱ्या जोडीदाराचा शोध घेतात. यासाठी सतत जोडीदार बदलले जातात.
काही जोडीदार असेही असतात, जे सतत कोणतेही काम करण्यापासून समोरच्याला थांबवतात. अति काळजी संबंधांचा अंत ठरतो. दुसऱ्या प्रकारात जोडीदार समोरच्याला टाळताना दिसतात, त्यांचे संबंध नावापुरते असतात. अशा दोन्हीवेळी जोडीदाराची फसवणूक होताना दिसते.
एकूणच तरुणांनी आपला जोडीदार निवडताना विचार करणे गरजेचे आहे.