मुंबईतील प्रसिद्ध पोद्दार आयुर्वेदीक रुग्णालयात इंटर्नशिप करणारे डॉक्टर विरुद्ध कॉलेज प्रशासन असा संघर्ष पेटलाय. इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना हॉस्टेल रिकामं करण्याची नोटीस प्रशासनाने बजावली आणि वादाची ठिणगी पडली. डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात आंदोलन सुरू केलं.
डॉक्टरांच्या या संपाची दखल अखेर आयुष मंत्रालयाला घ्यावी लागलीये. महाराष्ट्रातील आयुष संचलनालयाने याबाबत मंत्रालय स्तरावर चर्चा सुरू केलीये.
माय मेडिकल मंत्राशी बोलताना राज्याच्या आयुष संचलनालयातील एक अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, “डॉक्टरांच्या संपाबाबत आमची मंत्री कार्यालयाशी चर्चा सुरू आहे. पोद्दार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांसोबत अजूनही चर्चा झालेली नाही. आयुष संचलनालयाकडून पोद्दार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पत्र पाठवून, डॉक्टरांच्या संपाबाबत माहिती विचारण्यात आलीये. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहतोय.”
तर, दुसरीकडे, आयुष मंत्रालयाच्या युनानी इंन्स्टिट्युटचे माजी उपसंचालक डॉ. मोहम्मद रझा माय मेडिकल मंत्राशी बोलताना म्हणाले, “हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं ही राज्याच्या विविध भागातून आणि राज्याबाहेरून आलेली असतात. त्यामुळे या मुलांना अचानक होस्टेल रिकामं करण्यास सांगणं हे चुकीचं आहे.”
दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप सुरू आहे. माय मेडिकल मंत्राशी बोलताना, पोद्दार आयुर्वेदीक रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर म्हणाले की, “सोमवारच्या संपानंतर अधिष्ठात्यांशी चर्चा झालीये. आमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण, प्रशासनाकडून काहीच आश्वासन ठोस मिळालेलं नाही. इतकचं नाही तर रुग्णालयाच्या आवारामध्ये आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली नाही.”
सोमवारपासून पोद्दार रुग्णालयातील जवळपास ३०० डॉक्टर संपावर गेलेत. प्रशासनाने अचानक हॉस्टेल रिकामं करण्याची नोटीस दिल्याने डॉक्टर नाराज आहेत.