आजकाल स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय. तर स्मार्टफोनचं व्यसन लागणाऱ्यांचीही संख्या वाढतेय. नुकत्याचं केलेल्या एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती भावना व्यक्त करून शकत नाहीत शिवाय जास्त तणावाखाली असतात त्यांना स्मार्टफोनचं व्यसन लागतं.
डर्बी विद्यापीठ आणि नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केलंय. स्मार्टफोनचा वापर आणि ताणतणाव याच्यातील संबंध पडताळून पाहण्यासाठी त्यांनी ऑनलाईन अभ्यास केला. यामध्ये 16 ते 69 वयोगटातील एकूण 640 व्यक्तींचा समावेश कऱण्यात आला.
यामधून संशोधकांच्या लक्षात आलं की, ज्या व्यक्तींवर अधिक ताण-तणाव असतो त्या व्यक्ती स्मार्टफोनचा जास्त वापर करतात. आणि स्मार्टफोनचा अतिरिक्त वापर केल्याने त्यांना व्यसन लागतं. शिवाय एखाद्या व्यक्तीच्या चिडचिडेपणात वाढ झाली की ती व्यक्तीला हमखास स्मार्टफोनचं व्यसन लागतं.
यासंदर्भात डर्बी विद्यापीठाचे प्राध्यापक झहीर हुसैन यांच्या सांगण्यानुसार, जगभरात ४.२३ अब्ज स्मार्टफोन वापरले जातात. काही लोकांसाठी स्मार्टफोन ही त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील गरजेची गोष्ट झाली आहे.
ज्या व्यक्ती आपल्या भावना उघडपणे व्यक्त करत नाहीत त्यांना अति स्मार्टफोन वापरण्याची सवय लागते असंही या अभ्यासातून स्पष्ठ कऱण्यात आलंय.
हुसैन पुढे म्हणाले की, “लोकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात तणाव, चिंता, नैराश्य, कौटुंबिक अडचणी अशा प्रकारच्या अनेक समस्या असतात. परिणामी व्यक्तींची चिडचिड होते तर काही जण भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत. या समस्यांपासून दूर जाण्यासाठी या व्यक्ती स्मार्टफोनचा अधिकाधिक वापर करतात. मात्र हे फार चिंताजनक आहे.”