कडू गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्याऐवजी, गोड गोळ्यांमधून मिळणार होमिओपॅथीचं औषध प्रसिद्ध आहे. मात्र होमिओपॅथीचा उगम कसा झाला याविषयी सर्वसामान्यांना माहिती नसते. तसंच, ह्या उपचार पद्धतीच्या मुळाशी कुठला सिद्धांत आहे, याची माहिती असणंही गरजेचं आहे. जवळपास २०० वर्षांपूर्वी होमिओपॅथीचा शोध लागला. डॉ. सॅम्युअल हॅनेमान या जर्मन डॉक्टरनं होमिओपॅथी अस्तित्त्वात आणली. हॅनेमान स्वत: अलोपॅथीचे डॉक्टर होते. १७९६ साली होमिओपॅथी उपचार पद्धती अस्तित्त्वात आली आणि १८०७ सालापासून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली.
आजारच आजाराला संपवू शकतो, हा होमिओपॅथीचा मुळ सिद्धांत आहे. ज्या कारणांमुळे व्यक्ती आजारी पडते, त्याच कारणांनी ती बरीही होऊ शकते, या संकल्पनेवर होमिओपॅथीचा विकास झाला आहे. होमिओपॅथीमध्ये उपचाराचा केंद्रबिंदू आजार नसून रुग्ण असतो. आजाराचं निदान करण्याआधी रुग्णांचा इतिहास जाणून घेतला जातो. ‘मेडिकल हिस्टरी’ सोबतच, रुग्णांच्या इतर सवयींची नोंद घेतल्या जाते. याची वर्षानुवर्षे होमिओपॅथी डॉक्टर स्वत:जवळ नोंद ठेवतात.
१७९६ मध्ये शोध लागल्यानंतर एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत होमिओपॅथीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. १८३५ साली अमेरिकेत होमिओपॅथीचं शिक्षण देणारी पहिली संस्था उभी राहिली. त्यानंतर त्यांंची संख्या सतत वाढत गेली. युरोपातही होमिओपॅथीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. भारतात रोमॅनियन डॉक्टर जॉन मार्टिन होनिंगबर्गरच्या माध्यमातून होमिओपॅथीचा प्रवेश झाला. लाहोरचे महाराज रणजित सिंग अर्धांगवायूनं आजारी होते. त्यांच्यावर १८३५ साली डॉ. जॉन यांनी उपचार केले. या उपचारांनी महाराज बरे झाले. यानंतर हळू हळू ब्रिटीशांच्या गुलामीत असलेल्या भारतात होमिओपॅथीचा प्रसार झाला. १८७८ साली भारतातलं पहिलं होमिओपॅथी कॉलेज कोलकात्यात सुरु झालं. आज भारतात होमिओपॅथी पद्धतीनं उपचार घेणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे.
होमिओपॅथीच्या प्रसारासोबतच या पद्धतीवर वैद्यकीय जगतामधून टीकाही झाली. पण ही टीका चुकीची असून, होमिओपॅथीच्या साहाय्यानं अनेक दुर्धर आजार बरे होत असल्याचा दावा होमिओपॅथीच्या तज्ज्ञांकडून केला जातो.